‘अहो! शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’, संजय राऊत यांनी लगावला चंद्रकांत पाटलांना टोला !

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील सुरु असलेले शाब्दिक युद्ध काही थांबायचे नाव घेत नाहीये. त्यात पुन्हा एकदा मुंबईच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला असतानाच त्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

शिवसेनेने मुंबईसाठी काय केले? अहो! शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, असा टोला शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हाणला. शिवसेनेने मुंबईसाठी काय केले, या पाटील यांच्या सवालावर पत्रकार माध्यमांशी बोलताना राऊत यांनी, पाटील यांना असले सुंदर विचार सुचतातच कसे?, याचा तपास केला पाहिजे असा चिमटा काढला.

राऊत म्हणाले की, शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवली अन् मुंबईवर मराठी माणसाचा पगडा कायम ठेवला. चंद्रकांत पाटलांचे ब्रिटिशांवर फारच प्रेम दिसते. त्यांना जाऊन बराच काळ झाला. शिवसेनेने मुंबईसाठी काय केले, हे जरा महाराष्ट्रात जाऊन जनतेला विचारा. वाटल्यास या विषयावर सार्वमत घ्या. संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार वा महाराष्ट्राच्या हातून निसटणार, असे प्रसंग उभे झाले होते. पण शिवसेनेने बाणेदारपणे मुंबई महाराष्ट्रात ठेवली.

चंद्रकांत पाटलांसारखी माणसे मुंबईत येऊन आज जाहीरपणे बोलू शकतात, शिवसेना नसती तर तेही शक्य झाले नसते. ब्रिटिशांच्या कामांची आठवण करून देता ना, मग सध्या संसद भवनही ब्रिटिशांच्याच काळात झालेले आहे, असे सांगून राऊत म्हणाले, की मुंबईसाठी शिवसेनेच्या योगदानाची लंबी यादी देता येईल. रस्ते, पाण्यापासून स्थानिकांना रोजगारापर्यंतची अनेक कामे शिवसेनेने केलेली आहेत.

Team Global News Marathi: