पोलिसांची कामे अशी करतोस, अजित पवारांनी ठेकेदाराला चांगलेच सुनावले !

पुणे | अजित पवार हे आपल्या कडक स्वभावामुळे  सर्वत्र ओळखले जातात. एखादे चुकीचे काम नजरेस पडताच तिथल्या तिथे खडेबोल सुनवायला ते मागेपुढे बघत नाही. त्यातच आज सकाळी पालकमंत्री अजित पवार पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले. पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन वास्तूचं नुतनीकरण करण्यात येत असून वास्तूमध्ये आता विविध विभागाची कार्यालये सुरू केली जाणार आहे. या इमारतीच्या नुतनीकरणाची पाहणी अजित पवार यांनी केली.
तसेच सदर बांधकामासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. यावेळी सदोष काम करण्यात आलं असल्याचं अजित पवारांच्या निदर्शनास आलं. त्यांनी लागलीच संबंधित ठेकेदाराला बोलवण्यास सांगितलं आणि केलेल्या कामावरून चांगलेच खडेबोल सुनावले होते. आज तागायत अजित पवारांच्या काम करुन घेण्याच्या शैलीचं नेहमीच चर्चा होते.

विशेषतः ते सकाळपासूनच बैठका व भेटी घेण्यास सुरुवात करतात. सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन निदर्शनास आलेल्या चुका दाखवून देत संबंधितांचा समाचारही घेतात. असाच प्रसंग आज पोलीस मुख्यालयातील कामाची पाहणी करतेवेळी सर्वांना आला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील विविध कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सात वाजून तीस मिनिटांनी येणार असल्यानं अगोदर म्हणजे जवळपास सहा वाजल्यापासून सर्व अधिकाऱ्यांची तयारी सुरू होती.

अजित पवार हे ठरलेल्या वेळेनुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. गाडीतून उतरताच, त्यांनी समोर असलेल्या कौलारू बिनतारी कक्षाकडे पाहतच ‘वरच्या बाजूला गोलाकार करण्याची गरज होती का केले नाही?’, अशी विचारणा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्याकडे केली. त्यावर दोघेही अधिकारी म्हणाले, ‘आम्ही करून घेतो.’ त्यावर ‘या कामासाठी कोणता निधी वापरला,’ अशी चौकशी अजित पवार यांनी केली. ‘आम्ही विनामास्क कारवाईमध्ये जमा झालेल्या दंडातून काम केले आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
अजित पवार पाहणी करत पुढे गेले. थोडे पुढे जाऊन, कार्यालयाच्या छताकडे पाहून त्यांनी नाराजीचा सूर लावला. ‘अरे किती अंतर ठेवलं आहे. या कामाचा ठेकेदार कोण आहे? बोलावा त्याला अशी विचारणा त्यांनी केली. ठेकेदार समोर येताच अरे काय काम केलं आहे… रे, अरे पोलिसांची काम अशी करतोस असं त्यांनी सुनावलं. ‘कसं होणार सौरभ’, असं म्हणत त्यांनी आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली.

Team Global News Marathi: