गुजरात जिंकणारच होते, पण दिल्ली-हिमाचलने का नाकारलं? सामनातून रोखठोक सवाल

 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ सदरात गुजरात, दिल्ली, हिमाचलच्या निवडणुकांच्या निकालांवर भाष्य करत भाजपाला डिवचले आहे.
राजकारण एक खेळ आहे. चलाख लोक हा खेळ खेळतात. मूर्ख लोक त्यावर दिवसभर चर्चा करतात. सध्या आपल्या देशात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? मोदींनी गुजरात जिंकले. या विजयावरच आता चर्चा सुरू आहे.

भारतवर्ष एकत्र राहावे म्हणून ‘भारत जोडो’ यात्रेवर राहुल गांधी आहेत. त्याच वेळी देशातील दोन राज्यांच्या विधानसभा व दिल्ली महानगरपालिकेचे निकाल लागले. गुजरात सोडले तर दोन ठिकाणी भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपने गुजरात जिंकले त्यात नवल ते काय? मोदींचे गुजरात दुसरे कोण जिंकणार? पण हिमाचल, दिल्लीत लोकांनी का नाकारले, यावरही चर्चा होऊ द्या !असे म्हणत राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

गुजरातमधील प्रत्येक प्रचारसभेत नरेंद्र मोदी सांगत होते, “हे गुजरात माझे आहे. हे गुजरात मी बनवले आहे,” अशी भावनिक साद व काँग्रेसचे संघटनात्मक फोलपण यामुळे गुजरातवर भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने जे गमावले त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. भाजपने राजधानी दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता गमावली. दिल्ली महानगरपालिकेत भाजप पराभूत झाली.देशाच्या राजधानीतला हा पराभव. त्याच वेळी भाजपची सत्ता असलेले हिमाचल प्रदेश गमावले. काँग्रेसने येथे पूर्ण बहुमत मिळवून भाजपची सत्ता खेचून घेतली.

म्हणजे तीन सामन्यांत भाजप फक्त एके ठिकाणी, गुजरातमध्येच जिंकला. अन्य दोन ठिकाणी ते पराभूत झाले. मोदी-शहांची जादू आपल्या गृहराज्यात चालली, पण प्रत्यक्ष दिल्लीत व हिमाचल प्रदेशात चालली नाही. याआधी ती पंजाबमध्येही अजिबात चालली नाही, पण भाजप फक्त विजयाचा उत्सव साजरा करतो. त्या उत्सवात पराभवाची चर्चा करणे लोक विसरतात. हा मूर्खपणाच आहे,अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.

Team Global News Marathi: