सरकारची प्रतिमा मलिन करण्याची तुकाराम मुंढेंची प्रवृत्ती; आरोग्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक पदावरून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अचानक बदली होण्यामागे खुद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले पत्र कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली आहे. समज देऊनही मुंढे यांच्या वागणुकीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. उलटपक्षी आरोग्य विभागाची व पर्यायाने सरकारची प्रतिमा मलिन करण्याची त्यांची वृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी केली होती.

आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुंढे धमकावतात आणि त्यांना मंत्री कार्यालयात संपर्क न ठेवण्याच्या तोंडी सूचना देतात. आशा वर्कर्स व परिचर यांच्या शिष्टमंडळासमोर हुज्जतबाजी करून स्फोटक वक्तव्ये माझ्यासमोरच करून त्यांनी आंदोलकांच्या भावना दुखावल्या होत्या. राष्ट्रीय आरोग्य मिशन ठाणे येथे कार्यरत कार्यकारी अभियंता सोनवणे यांना मुंढे यांनी अचानक कामावरून काढले.

मात्र मी त्यांना सांगितले तत्काळ निर्णय घेऊ नका; मुंबईत आल्यानंतर चर्चा करून निर्णय घेऊ असे मी त्यांना म्हटले. तरीही त्यांनी सोनवणेंना काढले, पदाची जाहिरात प्रसिद्धीला दिली व मंत्री म्हणून माझ्या निर्देशांचा अपमान केला. मी त्यांना अनेकदा मोबाइल कॉल करतो, पण ते प्रतिसाद देत नसत, नंतर कॉलबॅक करण्याची तसदीही ते घेत नाहीत. मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे डॉक्टरांच्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

मुंडे यांचा ट्विट ?
आयुष्याची वाटचाल तुमच्या अपेक्षेनुनसार नेहमीच होत नसते… असे ट्विट तुकाराम मुंढे यांनी ४ डिसेंबरला म्हणजे त्यांच्या बदलीनंतर पाचव्या दिवशी केले. या ट्विटद्वारे त्यांनी बदलीमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त केल्याचे म्हटले जाते. भ्रष्टाचार खपवून न घेणारे अधिकारी अशी मुंढे यांची प्रतिमा राहिली आहे. आरोग्य मंत्री सावंत यांना न जुमानता त्यांनी विभागातील अपप्रवृत्तींना रोखण्याचे प्रयत्न केले व त्यातूनच त्यांचे खटके उडाल्याचे म्हटले जाते.

Team Global News Marathi: