राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. त्यातच खडसे यांच्या मागे लागलेली ईडीची चौकशीच्या मागे फडणवीसांचा हात असल्याचे खडसे यांनी अनेकवेळा बोलून दाखविले आहे. आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत जळजळीत टीका केली आहे.
एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरुन मला बदनाम करण्यात आलं. माझा छळ करण्यात आला. तो कोण आहे. माहिती आहे का? गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण विचारा,’ अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर निशाणा साधला.
तसंच इथल्या आमदारांना मी सांगतो तुम्ही कोणाच्या बळावर निवडून आला आहात. पण कुणाचं तरी ऐकायचं आणि नाथाभाऊच्या मागे ईडी लावायची. कधी अॅन्टी करप्शन लावायचं कधी इन्कम टॅक्स लावायचं. नाथाभाऊच्या घरावर दोन वेळा इन्कम टॅक्सची चौकशी झाली. रेड झाल्या, मात्र त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं. न्यायालयात सुद्धा तसा क्लोजर रिपोर्ट दिला आहे. मात्र तरीही आता ईडी लावण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझ्याकडे नाथाभाऊंचे शंभर उतारे असल्याचं काल गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मी त्यांना आव्हान देतो की, माझ्या खानदानी प्रॉपर्टीवर मी जे कमावले असेल, जे इन्कम टॅक्सला दाखवलं असेल त्याच्यापेक्षा एक रुपयापेक्षा जास्त पॉपर्टी असेल तर मी तुम्हाला दान करून टाकतो. असे विधान खडसे यांनी केले होते.