सोलापूर | ग्लोबर टीचर अॅवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी सध्या मोठ्या पेचात सापडले आहेत. एकीकडे अमेरिकेतील फुलब्राईट स्कॉलरशिपची संधी आणि दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी कायद्याचा बडगा उगारत दिलेला कारवाईचा इशारा त्यामुळे या सगळ्या प्रकरणात रणजितसिंह डिसले गुरुजी व्यथित झाले आहेत.
इतके की ते शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.
ग्लोबर टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला.पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी माध्यमांना सांगितलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसतं आहे. दरम्यान यावर आज जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.