सात आखाती देशांत जाणार देशी गायींचे तूप ; वाचा सविस्तर-

सात आखाती देशांत जाणार देशी गायींचे तूप

मुंबई : महानंदने तयार केलेला ‘महानंद घी’ हा ब्रँड सात आखाती देशांमध्ये जाणार असून मार्चपर्यंत २७ टन तूप पाठविले जाणार आहे. यातील पहिले २ टन तूप ३१ जानेवारी रोजी पाठविले जाणार आहे. महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते या निर्यातीचा प्रारंभ करण्यात आला.या कार्यक्रमासाठी पशु व दुग्धविकासमंत्री सुनील केदार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थित होते.

महानंद दुग्धशाळेचे तूप दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्यात येत असून ही बाब महानंद दुग्धशाळा व दूध महासंघासाठी सुवर्ण मानबिंदू आहे, असे अध्यक्ष पाटील म्हणाले. हे तूप महानंद दुग्धशाळेचे निर्यात करण्यासाठी पोर्ट शिपींग अँड लॉजिस्टीक इंडिया या निर्यातदार संस्थेला नियुक्त केले आहे.

एक लिटरचे जार तयार करण्यात आले असून ते दुबईमध्ये पाठविले जाणार असून तेथून ते आखाती देशांमध्ये पाठविले जाणार आहेत. दुबई, युनायटेड अरब अमिरात, कतार, ओमान,जॉर्डन या देशांमध्ये पाठविले जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत २७ टन तूप निर्यात करण्याची तयारी महानंदने केली आहे. एक लिटरचे जार वितरित करण्यासाठी उपयुक्त असल्याने ते पॅकिंग स्वरुपात तयार केले आहेत. देशी गायींच्या दुधशपासून हे तूप तयार केले असून आखाती देशांमध्ये त्याला मोठी मागणी आहे.

महानंद दुग्धशाळेचे दुध व दुग्धजन्य पदार्थ राज्यात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता आखाती देशांमध्येही निर्यातीचे पाऊल ठेवले आहे. श्रीखंड, आम्रखंड व पनीर ही उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्री होतात. आता लस्सी, ताक, सुगंधी दूध, तूप, दही आदी दुग्धपदार्थांत वैविध्य आणले आहे. यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील, प्रशांत पवार, प्रवीण सांगळी व प्रवीण पवार उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: