मुंबई | मुंबईत १५ ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास करता येणार असला तरी प्रवाशांना फक्त मासिक पास मिळणार असून तिकीट दिले जाणार नाही. मासिक पास देण्याची सुविधा उद्यापासून ‘एमएमआर’ रिजनमधील १०९ स्थानकांवर ऑफलाइन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सकाळी ७ ते रात्री ११ असे १६ तास ही सुविधा उपलब्ध असेल. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज ही माहिती दिली.
मुंबईतील लोकल प्रवासासाठी पालिकेने आज ‘मार्गदर्शक तत्त्वे’ जाहीर केली. यानुसार पालिका क्षेत्रात ५३ केंद्रांवर तर मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे स्टेशनवर ऑफलाइन पद्धतीने पास मिळवता येणार आहे. सद्यस्थितीत फक्त ऑफलाइन सुविधा राहणार असून लवकरच अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पास मिळवण्याची सुविधाही दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
असा मिळवा मासिक पास
११ ऑगस्टपासून रेल्वे स्थानकांवर लसीकरणाचे दोन्ही डोस झाल्याच्या प्रमाणपत्रांची ऑफलाइन पडताळणी होईल.
मासिक पाससाठी नागरिकांनी दुसरा डोस घेतल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्राची हार्ड कॉपी, छायाचित्र ओळखपत्र घेऊन रेल्वे स्थानकावर जावे.
या ठिकाणचे हेल्प डेस्क वैध पुरावे कोविड अॅपवर तपासून पाहील. या ठिकाणी पालिका पिंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असतील.
दोन्ही पुरावे वैध असल्यास पुराव्यांवर विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल. हे प्रमाणपत्र दाखवून पास घेता येईल. या पासवर प्रवासाची सुविधा 15 ऑगस्टपासूनच मिळेल.