एकनाथ शिंदे स्वीकारणार मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार? शिंदे म्हणतात की,

 

ठाणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. मान आणि मणक्याच्या त्रासामुळे उपचारांसाठीसध्या उद्धव ठाकरे हे गिरगावातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. तसेच आज सकाळी ८ : ३० वाजता मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया होणार असल्याचीही माहिती मिळते.

मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक मोठं वृत्त व्हायरल होत आहे. मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्याचं वृत्त मोठ्या चर्चेत आहे. मात्र, आता खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनीच याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

‘उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे’, असं ते व्हायरल वृत्त आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार माझ्याकडे सोपविण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलंही तथ्य नाही. उद्धव ठाकरेंवर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून पुढील तीन-चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील.’

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या या खोडसाळ मेसेज आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये’, अशी विनंती करत मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी, आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा विश्वासही व्यक्त केला. त्यामुळे, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार स्वीकारणार असल्याच्या या चर्चांना आणि अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे

Team Global News Marathi: