अकरा नागरिकांचा मृत्यू होऊनही शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम – अतुल भातखळकर

मुंबई : भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीमुळे ११ जणांनी आपला जीव गमावला होता. मात्र अदयाप सनराईज रुग्णालयावर असलेले शिवसेनेचे प्रेम काही कमी होत नाही. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही

तसेच या प्रकरणी साधे चौकशीसाठी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे तर कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील खाटा अधिग्रहित करण्याच्या यादीत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील व ३१ मार्च रोजी परवाना संपणाऱ्या सनराइज हॉस्पिटलचा समावेश करण्यात आलेला आहे. यातून शिवसेनेच्या छात्रछायेमुळेच सनराइज हॉस्पिटल सुरू होते हे सिद्ध झाले आहे, असा आरोप मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनायोद्धे व महापालिकेतील कर्मचारी यांना उपचार घेता यावा या सबबीखाली सनराइज हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली. या मान्यतेच्या प्रक्रियेसाठी महापालिकेचे अधिकारी, सनराइज हॉस्पिटलचे संचालक यांचा ‘रिव्हायवल सनराइज हॉस्पिटल’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला.

२५ एप्रिल २०२० रोजी दिलेल्या अर्जावर अर्थपूर्ण संवादातून केवळ दहा दिवसात नाममात्र प्रक्रिया करून ६ मे २०२०ला परवानगी देण्यात आली. असे करताना मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेशी नसल्याची माहिती असूनसुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

Team Global News Marathi: