गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत टीका केली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट जप्त होईल, अशी टीका करण्यात येत होती.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की,’मागील काही दिवसांपासून भाजप नेते गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट वाचणार नाही, असे म्हणत आहेत. १९८९ पासून भाजप गोव्यात काम करत असून सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांचे डिपॉझिट गेले होते.’ तसेच डिपॉझिट गेले म्हणून निवडणुका लढायच्याच नाहीत, असे निवडणूक आयोगाने म्हटलेले नाही, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’गोव्या सारख्या राज्यात पक्ष वाढवण्यासाठी अशा निवडणुका लढाव्या लागतात. परंतु यावेळी तर चित्र वेगळं आहे. डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे. हा मराठा साम्राज्याचा एक मंत्र आहे. पानीपतावर देखील दत्ताजी शिंदे हे घायाळ होऊन पडले आणि शेवटपर्यंत म्हणत होते की बचेंगे तो और लढेंगे आणि आम्ही लढणारे लोक आहोत असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.