सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या देशाच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. आज मोठया प्रमाणात उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होताना दिसत आहे. तसेच वैद्यकीय सेवा सुद्धा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यातच आता आमदार केसर सिंह यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आहे. केसर सिंह हे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते.
काही दिवसांपूर्वी आमदार केसर सिंह गंगवार यांना विधानसभेच्या बाहेर पत्रकाराने विनामास्क फिरत असताना प्रश्न विचारला होता की, कोरोना काळामध्ये आपण मास्क का नाही लावला? त्यावर आमदार साहेबांनी आता कोरोना संपला आहे, कोरोना कुठे आहे? असं म्हणत फोनवर बोलत तिथून निघून जाणं पसंत केले होते. मात्र कोरोना संपला असे म्हणणाऱ्या आमदाराचे कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिलला केसर सिंह यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बरेली येथे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना जवळपास 24 तास बेड मिळाला नव्हता, असा आरोप त्यांच्या मुलाने केला होते. त्यामुळे त्यांना नोएडाच्या यथार्थ रुग्णालयात नंतर भरती करण्यात आलं. मात्र आमदाराचे पुत्र विशाल यांनी उपचारादरम्यान बेड न मिळाल्यामुळे थेट योगी सरकारवर आरोप लावले होते.