मुंबईतील महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क वसुली ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन

 

मुंबई  | विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी घेण्यासाठी अर्जाचे (प्रॉस्पेक्ट) शुल्क १०० रुपये असावे, परंतु, मुंबईतील नामांकित महाविद्यालये मुंबई विद्यापीठ आणि युजीसीच्या गाईडलाईन्सचे उल्लंघन करून ३०० ते ५०० रुपये आकारत आहेत, असा आरोप आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन या विद्यार्थी संघटनेने केला आहे. तर यावर मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पौराणिक यांनी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.

मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ आवारात गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन छेडले आहे. वाशी येथील आयसीएल मोतीलाल झुनझुनवाला कॉलेजाने विकासनिधीच्या नावाखाली अतिरिक्त ८०० रुपये प्रमाणे विद्यार्थ्यांची २०१४ ते २०२० पर्यंत लूट केली आहे. यांसदर्भात समाजकल्याण विभागाच्या चौकशीत हे महाविद्यालय दोषीही आढळले. पण तरीही या महाविद्यालयावर विद्यापीठाकडून कारवाई होत नाही, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे.

पीएचडीसाठी ‘पेट’ या पूर्व तयारी परीक्षेत मुंबई विद्यापीठातील हिंदी विभागात आरक्षणाची पायमल्ली झाल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. ‘पेट’ परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसू दिले नाही, त्यामुळे हिंदी विभाग प्रमुखांवर अॅक्ट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी संघटनेचे प्रवक्ते आनंदराज घाडगे यांनी केली आहे.

Team Global News Marathi: