कोल्ड ड्रिंकच्या एका कॅनमध्ये १० चमचे साखर ? मधुमेहाचा वाढू शकतो धोका

 

आजकाल अनेकांना कोल्ड ड्रिंक (शीतपेये) अथवा एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय असते. भारतात तसेच परदेशातही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत , बरेच जण मोठ्या प्रमाणात कोल्ड ड्रिंक पिताना दिसतात. काही लोकांना वाटतं की ही सॉफ्ट ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराला बरीच पोषक तत्वे मिळतील किंवा एनर्जी मिळेल.

मात्र ही अतिशय चुकीची समजूत आहे. मात्र प्रत्यक्षात ही ड्रिंक्स शरीरासाठी अतिशय धोकादायक असतात. आणि त्याचे कारण असते त्यामध्ये असलेली अतिरिक्त प्रमाणातील साखर, ज्यामुळे मधुमेह तसेच हृदयविकाराचा धोका वाढवतात. जर तुम्हीही सातत्याने कोल्ड ड्रिंक पीत असाल तर ही सवय लवकर सोडवा. अतिरिक्त प्रमाणात साखर असलेली ही पेये आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सोडा, कोल्ड ड्रिंक, फ्रूट ज्यूस, एनर्जी ड्रिंक, स्वीट पावडर ड्रिंक आणि अन्य गोड पेयांचे सेवन तब्येतीसाठी हानिकारक असते. त्यामध्ये कॅलरी व साखर अतिरिक्त प्रमाणात असते. तुम्ही हे वाचून हैराण व्हाल की, सोडा अथवा सॉफ्ट ड्रिंकच्या एका कॅनमध्ये 7 ते 10 चमचे साखर असते.

एक ग्लास पाण्यात जर तुम्ही 10 चमचे साखर टाकलीत, तर ते किती गोड लागेल, यावरून अंदाज घ्या. एवढं गोड पाणी तर आपण पिऊही शकणार नाही. बहुतकरून कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरचे प्रमाण मर्यादेपेक्षा खूप जास्त असते. तसेच त्यामध्ये काही प्रमाणात कॅफेनही असते, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. कोल्ड ड्रिंक अथवा एनर्जी ड्रिंकच्या एका कॅनमध्ये सुमारे 150 कॅलरी असतात, आणि पोषक तत्वांचे प्रमाण असते नगण्य. जर तुम्ही रोज एनर्जी ड्रिंक अथवा कोल्ड ड्रिंकचे सेवन करत असाल, तर तुमचे वजन वाढू शकते. तसेच त्यामुळे मधुमेह, हृदयविकाराची समस्या आणि वेळेपूर्वीच मृत्यू होण्याचा धोकाही वाढतो.

Team Global News Marathi: