शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंदमुळे संपूर्ण शिवसेना हादरली असून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीनंतर शिवसेना आमदार- खासदारांच्या बैठकीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. “माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसाममध्ये दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा केला. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.