मुंबई | विधान परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानं पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडण्याची शक्यता नाही.
सध्या शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला जंगल सफारीसाठी गेले आहेत. आमदारांनी देश पाहायला हवा. पर्यटन करायला हवं. ते पर्यटन करुन माघारी परततील, असं म्हटलं आहे. यानंतर आता संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत. संजय राऊत यांच्या भांडूप येथील घराबाहेर काही बॅनर लावण्यात आले आहेत. स्थानिक नगरसेविका दिपमाला बढे यांनी हे बॅनर लावले आहेत. “तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है” असा मजकूर लिहण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. ”राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले किंवा महाराष्ट्र जिंकला असं नाही. तुम्ही एक जागा जिंकली, पण या राज्याची सूत्र शिवसेनेकडे, उद्धव ठाकरेंकडेच असतील. फार घमंड करू नका, ‘तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है.’ या बादशाहीला नख लावण्याची हिंम्मत अजून कोणाचीच नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला होता. यानंतर आता तोच धागा पकडत नगरसेविका दिपमाला बढे यांनी संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर लावले आहेत.