मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अशोक चव्हाणांना 1 वाजता फोन, काय झाली चर्चा ?

 

विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडी जिंकणार की पुन्हा एकदा भाजपच्या खात्यात जाणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. ‘शेरास सव्वाशेर मिळतोच’ असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत राज्यसभा निवडणुकीचा बदला घेणार असे जणू आव्हानच दिले आहे. तर, महाविकास आघाडीचा धर्म पाळत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे हात मजबूत केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा 1 वाजता काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना फोन करुन अधिकची मतं काँग्रेसला देणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेकडे असलेली अधिकची 4 ते 5 मतं शिवसेना काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेकडे एकूण 55 आमदार आहेत, तर विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनच्या 2 उमेदवारांना प्रत्येकी 26 मतं आवश्यक आहेत.

मात्र, त्या उमेदवारांना आवश्यक मतांपेक्षा 2 मतं जास्त देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. म्हणजेच 28 प्लस 28 एकूण 56 मतं शिवसेनेचे स्वत:च्या उमेदवारांना मिळणार आहेत. त्यात एक अपक्ष आमदाराचं मत असेल. त्यामुळे, शिवसेनेकडे अपक्षांची अतिरिक्त असेलली मतं शिवसेना काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेसोबत 7 अपक्ष आमदार आहेत, त्यांपैकी उर्वरीत मतं काँग्रेसला देण्यात येणार आहेत.

सकाळपासूनच आमदारांची विधानभवनाकडे आगेकूच होताना दिसून येत आहे. पर्यंटनमंत्री आदित्य ठाकरे स्वत: एक बस घेऊन विधानभवनाकडे निघाले आहेत. तर, भाजप नेतेही बसमधूनच विधानभवनात पोहोचले आहेत. त्यामुळे, 1 उमेदवाराचा पराभव होणार आहे, तो आमदार कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला असून सायंकाळपर्यंत त्याचं उत्तर मिळेल.

Team Global News Marathi: