मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उच्च न्यायालयात दाखल झाले असून न्यायालयात का दाखल झाले याचे कारणं अद्याप समोर आलेले नाही. सध्या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याबाबत हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा आरक्षणासोबतच राज्यातील कोरोना परिस्थिती याबाबातही चर्चेची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक उच्च न्यायालयात का आले? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
समोर आलेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी यांच्यासोबत उच्च न्यायालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहलही उपस्थित असल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ११.०० च्या सुमारास हायकोर्टात दाखल झाले. प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांची किंवा कोणत्याही मंत्र्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री हे प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊ शकतात. तब्बल अर्ध्या तासापासून मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू असून नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दोन नियोजित मुख्य कार्यक्रम होते. सकाळी ११.०० वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त वर्षा निवासस्थानी महात्मा बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण करणे आणि दुपारी १.३० वाजता उस्मानबाद साखर कारखान्याचं दृश्यप्रणाली द्वारे उद्घाटन करणे आदी दोन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत होते. मात्र, महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केल्यानंतर त्यांचा थेट ताफा कोर्टात आल्याने कोर्टातील कर्मचारी आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली होती.