सफाई कर्मचाऱ्याने चुकीचे इंजेक्शन दिल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू,

मुंबई | एका दोन वर्षांच्या मुलाला चुकीचं इंजेक्शन दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून सदर मुलाला एका सफाई कर्मचाऱ्याने हे चुकीचं इंजेक्शन दिलं असल्याचं वृत्त समोर येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यासह रुग्णालय मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शिवाजी नगर पोलिसांनी बुधवारी मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या नूर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि रुग्णालयाच्या मालकाविरुद्ध एफआयआर नोंदवला असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

एका इंगर्जी वृत्त माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी रोजी एका दोन वर्षांच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील एका १८ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने कथितरित्या चिमुकल्याला इंजेक्शन दिले होते. हे इंजेक्शन त्याच वॉर्डमध्ये दाखल असलेल्या मलेरियाच्या रुग्णासाठी होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. १३ जानेवारी रोजी या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.

Team Global News Marathi: