मुंबई | महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पुरावे असल्याचा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने भुजबळांनी विशेष न्यायालयात दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्जाला शुक्रवारी विरोध केला.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आपल्यावर कारवाई करण्याइतपत तपास यंत्रणेकडे पुरावे नाहीत, असा दावा करत छगन भुजबळ यांनी विशेष दोषमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला एसीबीने विरोध केला. भुजबळ व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महाराष्ट्र सदनचे नूतनीकरण करणारे कंत्राटदार के. एस. चमणकर इंटरप्रायझेस यांनी लाच दिल्याचे पुरावे एसीबीकडे आहेत, असे एसीबीने म्हटले.
तसेच या याचिकेवर पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणातील मूळ तक्रारदार अंजली दमानिया यांनी या अर्जात हस्तक्षेप करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. न्यायालयाने त्यांना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यास सांगितले.