चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले, नाना पटोले यांचा जोरदार टोला

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालेली असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली नसल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या नैराश्येतून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे केली.

चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मतदारांना त्यांच्या बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे जमा करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. शिवाय कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हा गैरप्रकार असून याप्रकरणी आपण ईडीकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. पाटील यांच्या या विधानाचा पटोले यांनी सोमवारी समाचार घेतला.

भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर भाजपची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भाजपने कोल्हापुरातील मतदारांनाच दिली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत पराभव दिसत असल्याने भाजप ईडीच्या आश्रयाला गेल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

Team Global News Marathi: