राज्याच्या ‘या’ भागात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : मराठवाड्याच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.१२) संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अवकाळीच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.

चक्रीय वाऱ्यांमुळे विदर्भ व छत्तीसगड परिसरांत असलेल्या भूपृष्ठावरील बाष्प ओढून घेतले आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. वाढत्या उकाड्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

गुरुवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १४ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली. कोकणात किमान तापमानाचा पारा २२ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात १८.२ अंश सेल्सिअस, तर विदर्भात १६.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे.

राज्यातील मराठवाडा व विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणात कोरड्या हवामानासह काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कमाल तापमानात काही प्रमाणात चढ-उतार असल्याचे दिसून येते. चंद्रपूर येथे कमाल तापमानाची ३९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

दरम्यान, मराठवाड्यात ३८.३ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाचा पारा गेला आहे. मध्य महाराष्ट्रात ३८.७ अंश सेल्सिअस, तर कोकणात ३५.६ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

विदर्भात येथे पावसाची शक्यता
शुक्रवार – अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा
शनिवार – अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा

ग्लोबल न्युज नेटवर्क: