‘छत्रपती शिवाजी महाराज’ उड्डाणपूल नामकरणाबाबतची अक्षम्य दिरंगाई, छेडछाड भाजप खपवून घेणार नाही”

घाटकोपर – मानखुर्द जोडमार्ग वीर जिजामाता भोसले मार्गावरील महापालिकेच्या उड्डाणपुलास “छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल” असे नामकरण करण्याच्या प्रस्तावास महापालिकेकडून अक्षम्य दिरंगाई होत असून जुलै महिन्यात याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंजूर न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर, अध्यक्ष स्थापत्य समिती (उपनगरे) यांना लेखी पत्राद्वारे दिला.

वीर जिजामाता भोसले मार्गावरील पूर्व मुक्त मार्गापासून सुरु होणाऱ्या व शिवाजी नगर येथून जाणाऱ्या उड्डाणपुलास “छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल” असे नाव देण्याबाबत खासदार मनोज कोटक यांनी दिनांक ०९ डिसेंबर २०२० रोजी दिलेले पत्र दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजीच्या स्थापत्य समिती (उपनगरे) कार्यक्रमपत्रिकेवर आले असतानाही हा विषय आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला.

या विषयाबाबत जून २०२१ च्या कार्यक्रमपत्रिकेवर विषय क्रमांक ३२ मध्ये आयुक्तांकडून अनपेक्षित व आश्चर्यकारक अभिप्राय आला. या अभिप्रायास भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी तीव्र विरोध करत नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी उपसूचना मांडून आग्रह धरल्यानंतरही अध्यक्ष स्थापत्य समिती (उपनगरे) यांनी या विषयास मंजुरी न देता अनाकलनीय कारणासाठी हा विषय अनिर्णीत ठेवला. ही बाब अत्यंत खेदजनक व निषेधार्ह आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

१८ जानेवारी २०२१ च्या कार्यक्रम पत्रिकेवर उपरोक्त उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असा नामकरणाचा प्रस्ताव स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी मांडल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे दि. १० जून २०२१ रोजी शेजारील लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या उड्डाणपुलास ‘ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी’ असे नामकरणासाठी पत्र दिले आणि २३ जुलै २०२१ च्या गटनेत्यांच्या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय क्रमांक ६ मध्ये समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेता रईस शेख यांनी याच उड्डाणपुलास ‘सुल्तानुल हिन्द ख्वाजा गरीब नवाज’ (र.अ) असे नामकरण करण्यासाठी पत्र दिलेले आहे.

एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कार्यक्रम पटलावर आल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी शिवसेना खासदार आणि समाजवादी पक्ष गटनेता यांनी दुसरे नाव सुचविणे हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उपमर्द आहे. त्यामुळे गटनेत्यांच्या सभेतील सदर प्रस्ताव दफ्तरी दाखल केला पाहिजे अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मांडली.

सदर नामकरणाबाबत भारतीय जनता पक्षाचा आणि मुंबईकरांचा आग्रह अतिशय तीव्र असून नामकरणास दिरंगाई करणे अक्षम्य अपराध ठरणार असून सदर उड्डाणपुलाचे काम दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पूर्वी पूर्ण होणार आहे असे प्रशासनाने सभागृहाच्या पटलावर कबूल केलेले आहे.

Team Global News Marathi: