भाजपच्या जागा शिवसेनेने पाडल्या; मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता

 

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द मी उद्धव ठाकरे यांना कधीही दिलेला नव्हता, असे सांगतानाच २०१९ मध्ये युती असूनही शिवसेनेने भाजपच्या काही जागा पाडल्या, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला. अमित शहा यांनी २०१४ मध्ये शिवसेनेसोबतची युती तुटल्यापासूनचा घटनाक्रम सांगितला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, २०१४ मध्ये केवळ दोन जागांच्या हट्टापायी शिवसेनेने युती तोडली. युती तोडून आपण जास्त जागा जिंकू आणि मुख्यमंत्रीपद मिळवू असे ‘खयाली पुलाव’ ते शिजवत होते; पण भाजपच्या जवळपास दुप्पट जागा आल्या. शिवसेना भाजपपेक्षा लहान पक्ष झाला. ते आम्ही नाही केले, त्यांनीच युती तोडून पायावर दगड मारून घेतला. उद्धव ठाकरे यांचा अहंकार त्यावेळी आडवा आला. निकालानंतर शिवसेना सुरुवातीला आमच्यासोबत आली नाही. आम्ही ठरवून टाकले की अटलजींसारखे तेरा दिवसांचे का होईना; पण सरकार आणायचेच. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. आमच्याकडे बहुमत नव्हते; पण मग शिवसेनेची मजबुरी होती, ते आमच्यासोबत आले आणि सरकार पाच वर्षे टिकले.

२०१९ मध्ये एकदा रात्री दोन वाजेच्या सुमारास मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. लोकसभा निवडणुकीच्या आधीची ही गोष्ट आहे. लोकसभा, विधानसभेची युतीची बोलणी एकत्रितच करा आणि आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्या असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत, असे फडणवीस माझ्याशी बोलले. मी कधी नशापाणी करीत नाही. मी त्यांना बजावून सांगितले की, मुख्यमंत्रिपद त्यांना मिळणार नाही. युती तुटली तरी चालेल; पण तरीही आपल्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांना बोलून घ्यायला सांगा, असे मी फडणवीसांना सांगितले.

Team Global News Marathi: