आयुष्यात कधी कधी निर्लज्ज बनावं!!

आयुष्यात जाणीवपूर्वक काही गोष्टी सोडाव्या लागतात तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं.

निर्लज्जंम सदासुखमं!
सौ.सुधा पाटील

खरं तर वरील उक्तीचा विचार केला तर, ती खरोखरच योग्य वाटते.कारण एखादा माणूस कितीही काहीही होवो पण आयुष्यातील संतुलन बिघडू देत नाही.आपण बऱ्याच माणसांना किंवा आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना किंवा स्वत:च्या मनासारखं वागणाऱ्या माणसांसाठी वरील वाक्य खूपदा वापरतो.

 

पण मला असं वाटतं की, आयुष्य सदैव आनंदी, संतुलित,स्थिर जगण्यासाठी असं बनावचं लागतं.आयुष्यात माणसांचे अनंत प्रकार असतात.कारण एकच माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं वागत असतो.खूपदा भीडेखातर काही माणसांना “नाही” म्हणता येत नाही.

 

तर काही काही माणसं इतरांचं बोलणं खूप मनाला लावून घेतात आणि नैराश्याच्या गर्तेत जातात.काही काही माणसं उगाचंच नको त्या गोष्टींचा अतिविचार करत बसतात.

काही काही माणसांना आपली खरी बाजू पटवून देताच येतं नाही. किंवा कधी कधी समोरचा खरी बाजू समजून घेतंच नाही.अशावेळी माणसं दु:खं करत बसतात.खूप हळवी असणारी माणसं तर उभं आयुष्य उदासपणात संपवतात.

 

मग अशांना हे सुंदर जीवन जगणं जमतंच नाही.मग अशा वेळी विचार येतो की,जी माणसं कशाचीच फिकीर करीत नाहीत किंवा ज्यांना परिस्थिती नुसार निर्लज्ज बनता येतं ती खरंच आनंदाने जगतात.

म्हणूनच वाटतं की,या जगातील रितीरिवाजानुसार, परिस्थिती नुसार,माणसांच्या वृत्तीनुसार कधी कधी निर्लज्ज देखील बनता यायला हवं.तरच दु:खं पचवून जगता येतं.नाहीतर फायदा घेणारे घेतच राहतात आणि हळवी मनं नाहकच आपला बळी देतात.

म्हणूनच आपणास आपली ओळख होणं गरजेचं असतं.कारण आपण आपल्या जागी योग्य आहे याची खात्री झाली की, माणूस जगासाठी निर्लज्ज असला तरी स्वत:साठी योग्यच असतो.पण अशावेळी मनाचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो.

कारण आपल्यामुळे कोणीही उगाचंच दुखावत नाही ना याचा विचार प्रामाणिक मन नक्कीच करत असतं.म्हणूनच आयुष्यात कधी कधी बनावं निर्लज्ज आणि बनावं सदासुखी! कारण आयुष्यात जाणीवपूर्वक काही गोष्टी सोडाव्या लागतात तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं.तरच आयुष्यात आनंद घेता येतो आणि देताही येतो.वरील उक्ती म्हणजे केवळ माणसाचा दुर्गुण नाही तर ती एक आनंदी जगण्याची रीत आहे.तो मानला तर एक मंत्र आहे… सकारात्मक जगण्याचा… मानसिक आरोग्य उत्तम असण्याचा….!

पुन्हा इथे तुम्ही वरील उक्तीचा कसा विचार करता यावर तुमचा दृष्टीकोन अवलंबून आहे!

ग्लोबल न्युज नेटवर्क: