औरंगाबाद नामांतराला विरोध करण्यासाठी १२ जुलै रोजी मूक मोर्चा;

 

औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराला विरोध करण्यासाठी 12 जुलैला शहरातील भडकल गेट ते आमखास मैदानापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नामांतर विरोधी कृती समितीकडून देण्यात आली आहे.तर या मोर्च्यात तब्बल पन्नास हजार मोर्चेकरी सहभागी होणार असल्याचा दावा सुद्धा कृती समितीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा या मोर्च्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नामांतरविरोधी कृती समितीचे समन्वयक अय्युब जहागीरदार, गौतम खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद नामांतरविरोधी संघर्ष समितीच्या वतीने 12 जुलै रोजी दुपारी 2 वाजता भडकल गेट ते आमखास मैदानापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तोंडावर काळी पट्टी बांधून, हातात तिरंगा झेंडा घेऊन हा मोर्चा निघेल.

तसेच आमखास मैदानावर सभा पार पडेल. यासाठी 50 हजार मोर्चेकरी जमा होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कृती समितीने वर्तवला आहे. तर या कृती समितीच्या अध्यक्षपदी खासदार इम्तियाज जलील यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतराच्या मुद्दयावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे नवा बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी मंत्रीमंडळाची बैठक घेतली होती. ठाकरे यांनी आपल्या या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्च्वाचे निर्णय घेतले होते. ज्यात औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यांच्या याच निर्णयानंतर नामांतराचा मुद्दा आणखी एकदा चर्चेत आला आहे.

Team Global News Marathi: