राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीमध्ये आणि राज्य सरकारमध्ये विविध मुद्द्यावरून वाद होत असल्याचे चित्र दिसून आले आहे अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि ‘भारत हे हिंदू राष्ट्र होते हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच राहिल’ असे लिहिलेल्या मजकुरावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेत कोणत्याही धर्माचा, जातीचा भेदभाव अजिबात नाही. त्यामुळे तो देश वेगाने प्रगती करु शकला. त्याचपध्दतीने भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत आलो आहोत.मात्र आता अशा भूमिका भाजपचे काही प्रमुख नेतेच मांडणार असतील तर ती चिंतेची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
जगात ज्यावेळी धर्माला जास्त महत्व दिले जाते, त्यामध्ये विशेषतः सर्व मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांची फारशी प्रगती झालेली नाही. अमेरिका, इंग्लंडसारख्या राष्ट्रात गेलात तर सर्वांचे स्वागत होते आणि त्या देशांची प्रगती वेगाने झाली आहे. त्यामुळे आपले हिंदू राष्ट्र आहे हे सांगण्याची, दाखवण्याची आवश्यकता नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. आपण बहुसंख्य हिंदू भारतात राहतो आणि भारताच्या सर्व व्यवस्थेवर हिंदू धर्मात असणार्या विद्वान लोकांचा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. पण आपलेच हिंदू अमेरिकेत जाऊन देखील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ झाले आहेत. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी भारतीय हिंदू समाज हा गेलेला आहे, याची आठवण जयंत पाटील यांनी करुन दिली.