सांगली जिल्ह्यासह सर्वत्रच शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची बिकट अवस्था झाली आहे. ‘नवरी मिळेना नवऱ्याला’ या विशेष परिषदेच्या माध्यमातूनएका प्रसिद्ध माध्यमाने या प्रश्नाला वाचा फोडली होती. या परिषदेची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आता शेतकरी मुलांच्या लग्नाच्या विषयावरुन लवकरच वरात मोर्चा काढणार आहे. शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस दहा लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर पाच लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न ही एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकरी मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीस दहा लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर पाच लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. शिवाय या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात मोर्चा काढणार असल्याचे खराडे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना मुलाखती देताना त्यांनी हे विधान केले आहे आता त्यांच्या या विधाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सध्या ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ हेच सर्वत्र ऐकायला मिळते . शेतकरीही आपली मुलगी शेतकरी मुलाला देण्यास तयार नाहीत. मुलगा शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी नकोच हे तरुण मुलींनीही ठरवून टाकले आहे. या मानसिकतेमुळे प्रत्येक गावात किमान 40 ते 50 मुले बिनलग्नाची आहेत. चाळिशी पार केलेली मुले लग्न कधी होणार या विवंचनेने ग्रासलेली आहेत. त्याचे कुठे कामात लक्ष नसते, त्याच्यात चिडचिडपणा वाढलेला आहे. काहीजण मनोरुग्ण झालेले आहेत.