काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला न्यायालयाचा दिलासा

 

मुंबई | अभिनेता सलमान खान याच्यासाठी जोधपूर न्यायालयातून दिलासादायक वृत्त आहे. हाय कोर्टाने सलमान खानकडून केलेल्या ट्रान्सफर पिटीशनचा स्वीकार केला आहे. यानंतर आता सर्व प्रकरणात सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होईल. हाय कोर्टाच्या निर्णयानंतर सलमान खानला वारंवार दुसरीकडे जावं लागणार नाही.

सोमवारी हाय कोर्टात सलमान खानच्या वकिलांना आपलं म्हणणं मांडलं. ज्यानंतर कोर्टाने आपला निर्णय सुनावला. यादरम्यान सलमान खानची बहीण अलवीरा कोर्टात उपस्थित होती. हे संपूर्ण प्रकरण काळवीट शिकार प्रकरणातील आहे. काय आहे काळवीट शिकार प्रकरण… सलमान खान सप्टेंबर १९९८ मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होता.

यावेळी तो चित्रपटातील सहाय्यक अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीला गेला होता. तेथे त्याने संरक्षित काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. २७, २८ सप्टेंबर, ०१ ऑक्टोबर आणि ०२ ऑक्टोबर रोजी शिकार झाली. सलमानला शिकारीसाठी चिथावणी दिल्याचा आरोप सहकारी कलाकारांवर होता. त्यानंतर सलमान खानला अटक करण्यात आली.

या प्रकरणात सलमान खान वगळता इतर सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोन चिंकारास शिकार केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचवेळी जोधपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने कांकणीमध्ये काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरवले. तसेच याप्रकरणी सलमान खानला शिक्षाही झाली आहे.

Team Global News Marathi: