‘आंगणेवाडीला जाताना विमानात आम्ही गप्पा मारल्या होत्या, लटके यांच्या निधनानंतर निलेश राणे भावुक

 

 

मुंबई: शिवसेनेचे मुंबईतील आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनाच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसनेचे कट्टर वैरी मानले जाणाऱ्या राणे कुटुंबीयांनीही रमेश लटके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून आपला शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आमदार रमेश लटके यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाताना विमानात आम्हा दोघांची भेट झाली होती. त्यावेळी मी वजन कमी केल्याबद्दल रमेश लटके यांचे कौतुकही केले होते. आमच्यात पक्षीय भेदापलीकडचे मैत्रीचे नाते होते. रमेश लटके यांच्या निधनाच्या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ट्विट करून रमेश लटके यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला. शिवसेनेचे अंधेरी पूर्व (मुंबई) चे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! लटके परिवार व शिवसैनिकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असे अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

रमेश लटके हे आपल्या कुटुंबीयांसमोबत दुबईत गेले होते. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले होते. लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली होती मात्र काळाने त्यांच्यावर घात केला.

Team Global News Marathi: