नरेंद्र मोदींवरील पुस्तक राजकारणातील लोकांसाठी ‘गीता’ ठरेल – अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणातील २० वर्षांच्या नेतृत्वाला समजून घेण्यासाठी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील तीन दशकांमधील संघर्षाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. नवी दिल्लीत बुधवारी Modi@20: Dreams Meeting Delivery या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

या पुस्तकातून नरेंद्र मोदींच्या राजकारणातील तसंच प्रशासनातील कामाची माहिती मिळणार आहे. नरेंद्र मोदींचे मंत्रिमंडळातील सहकारी, तज्ज्ञ आणि काही महत्वाच्या लोकांनी या पुस्तकासाठी लिखाण केलं आहे. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. “एक पूर्ण व्यक्तिमत्व तयार करण्याच्या मार्गावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आणि सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे पुस्तक गीतेप्रमाणे असेल,” असं अमित शाह म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदींच्या सुरुवातीच्या कार्यकाळातील तीन दशकांमध्ये सर्वांसाठी धोरण तयार करताना समोर येणाऱ्या समस्यांना समजून घेण्याची ताकद निर्माण झाली असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींच्या पुढील २० वर्षातील प्रवासावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “निवडणूक लढण्याचा कोणताही अनुभव नसताना ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अशा अनुभवासोबत वारंवार पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवडून येणं हा मोठी अभिमानाची बाब आहे”

Team Global News Marathi: