‘आमचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प’,

 

शिवेसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज माध्यमांना विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आगामी पुढच्या अडीच वर्षात नवं सरकार काय-काय कामे करेल याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करायची आहे. त्यांच्यासाठी विविध योजना आणायच्या आहेत जेणेकरुन शेतकऱ्यांची आत्महत्या नाहीशी होईल, महाराष्ट्र आत्महत्यामुक्त होईल, असा संकल्प असल्याचं एकनाथ शिंदे मुलाखतीत म्हणाले. “महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच स्वप्न आणि ध्येय आमचं आहे. विकास कामे पूर्ण करायचे आहेत.

मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास मुंबईतील दळणवळण यंत्रणा सक्षम होईल. शेतकऱ्यांशी संबंधित जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्प रखडलले आहेत ते प्रकल्प मार्गी लागले तर मोठ्या प्रमाणातील पाण्याचं सिंचन होईल. बळीराजा हा आपला मायबाप आहे. त्याला सुखी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

शेतकऱ्यांसाठी आम्ही महत्त्वाची पाऊलं उचलणार आहोत. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आमचा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव दांडगा आहे.त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याच्या भवितव्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू. राज्यात मोठमोठे उद्योग येतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल. राज्याच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करु”, असं शिंदे यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: