डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश आचरणात आणून भारतीय राज्यघटनेच्या संरक्षण, संवर्धनासाठी प्रतिबद्ध होणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

 

डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क, स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिले. ‘शिका आणि संघटीत व्हा’ या त्यांच्या संदेशाने बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचे कल्याण केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचे, देशाची सार्वभौमता अखंडित ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झाले. नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानाने जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे.
डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणे, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा विकास करणे, हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे, स्मृतींचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

Team Global News Marathi: