आता बेस्ट प्रवासातही पोलिसांना सुद्धा काढावी लागणार तिकीट

 

मुंबई | मुंबईत बेस्टच्या बसमधून पोलिसांचा मोफत ‘बेस्ट’ प्रवास आता बंद होणार आहे. बेस्टने पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मोफत पास देऊ नयेत, असे मुंबई पोलिसांनी बेस्ट प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना १ जूनपासून बेस्टच्या बसमधून प्रवास करायचा असल्यास पैसे देऊन तिकीट घ्यावे लागणार आहे. या निर्णयामुळे पोलिस दलामध्ये नाराजीचे चित्र आहे.

मुंबई पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कर्तव्यावर हजर होताना, घरी जाताना किंवा अन्य काही कामासाठी बेस्टच्या बसमधून प्रवास करण्यासाठी पोलिसांना मोफत पास दिला जात होता. या पासांबाबत बेस्ट प्रशासनाने बिले पाठविल्यानंतर पोलिस दलाकडून ही रक्कम अदा केली जात होती.

मात्र १ जूनपासून ही कार्यपद्धत बंद करण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईतील पोलिसांना दैनंदिन कामकाजासाठी वाहने देण्यात आली आहेत. त्यातच बहुतांश अधिकारी स्वतःचे वाहन वापरतात. कर्मचारी मात्र मोठ्या संख्येने बेस्टच्या बसमधून प्रवास करतात. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.

बेस्ट बसचा मोफत प्रवास बंद करताना पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरसकट प्रवासखर्च मिळावा, यासाठी आयुक्तांनी वेतनामध्येच प्रवासभत्ता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा भत्ता नक्की किती असेल, हे समजू शकले नाही. त्यामुळे बेस्ट बसचा मोफत प्रवास चांगला होता की, प्रवासभत्याच्या निर्णय योग्य आहे, हे पगार झाल्यानंतरच समजेल, अशी प्रतिक्रिया अनेक पोलिसांनी दिली.

Team Global News Marathi: