यंदा पार पडणारा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
दसरा मेळावा केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत पुन्हा एकदा विधान केलं आहे. महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या शिवसेनेत प्रवेश करताय. सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन झालेलं आहे, अशा लोकांच्या भावना आहेत. आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय. त्यामुळे आमचा दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.