मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मोठी घोषणा केली. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत अयोध्या दौऱ्याची तारीख घोषित केली. पाच जूनला पक्षातील सर्व सहकाऱ्यांसोत अयोध्येला जाणार आहे, तिथे जाऊन दर्शन घेईन, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली असून मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन त्यांनी देशभरातील नागरिकांना केले आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज्य सरकारला हे भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.
ठाण्यात जोरदार पोस्टरबाजी
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसे तयारीला लागली आहे. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवर राज ठाकरे यांचा भगवी शाल पांघरलेला फोटो असून बाजूला राजतीलक की करो तयारी आ रहा है भगवा धरी असा उल्लेख बॅनर वर करण्यात आला आहे.