५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, विचारांचं सोनं शिवाजी पार्कवरच

 

उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात मोठ्या प्रमाणात दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे.
शिंदे गटातील नेते आणि मंत्री मेळाव्यासाठी मोठ्या प्रमााणात मतदारसंघातील लोकांना घेऊन मुंबईत दाखल होत आहेत. अनेक बसेस आणि रेल्वे गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यासोबत खासगी वाहनांनीही मुंबईचा रस्ता धरला आहे. शिंदेगटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होत असून येथे गर्दी करण्यासाठी गावखेड्यातून शिवसैनिक येत आहेत.

तसेच लाखो शिवसैनिक मेळाव्याला येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या रात्रीच्या जेवणाचीही सोय शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना शिवसेना खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष प्राधान्य देत गर्दी जमविण्यासाठी स्पर्धाच चालवली आहे.

 

त्यातच, आता एसटी महामंडळही मेळाव्यासाठी कामाला लागले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड या मतदारसंघातून तब्बल ३५० एसटी महामंडाळाच्या बसेस मुंबईला येत आहेत. त्याचप्रमाणे इतरही आमदार आणि मंत्री आपल्या आपल्या मतदारसंघातून लोकं घेऊन येणार आहेत. या सर्वांच्या जेवणासाठी बीकेसी मैदानावर सर्वांना जेवणाची पाकीटं दिली जाणार आहेत. शिंदे गटाकडून देण्यात येणाऱ्या जेवणाच्या पॅकेट्सवर शिवसेना नेते राजन विचारे यांनी टिका केली आहे. ५० खोके एकदम ओके, खोक्यातून झालेल्या लुटीतून हे फूड पॅकेट्स देण्यात येत आहेत. मात्र, विचारांचं खरं सोनं शिवाजी पार्कवरच मिळणार असल्याचं राजन विचारे यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: