शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू! विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा

संभाजीनगर: ‘समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही बोलणार आणि त्याला तरीही जर समजलं नाही तर आम्ही आमच्या भाषेत त्याला समजावू’ असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृषी विमा कंपन्यांना खणखणीत इशारा दिला आहे.

विमा कंपन्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना नाडत योजनेमध्ये घोळ निर्माण केला आहे. हा घोळ आता उघडकीस यायला सुरुवात झाली आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की “मोठमोठ्या विमा कंपन्यांच्या दलालांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे गोळा केले. ज्यावेळी नुकसानभरपाई देण्याची वेळ आली तेव्हा ते दिसत नाहीयेत” शेतकऱ्यांना नाडणाऱ्या या विमा कंपन्यांना उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील लासूरमध्ये  झालेल्या कार्यक्रमातून स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. “तुमची कार्यालये मुंबईत आहेत, जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नडाल तर तुमची मुंबईतली ऑफिसेस बंद करून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.” शिवसेनेने सुरू केलेल्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे लासूरमध्ये आले होते, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना पीक विमा कंपन्यांना हा इशारा दिला आहे.

शिवसेनेचा जन्म हा मुळात तुमची सेवा करण्यासाठी झालेला आहे असं म्हणताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी त्यांना दिलेल्या अर्जाबाबत महत्त्वाचे विधान केले. ”हे अर्ज घेऊन मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे, जरूर पडली तर शेतकऱ्यांनाही त्यांच्याकडे नेईन” असे ते म्हणाले. शिवसेना सत्तेमध्ये सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.  या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांकडे बोट दाखवत उद्धव ठाकरे म्हणाले की, ”हे नीरव मोदी किंवा विजय मल्ल्या नाहीयेत जे बँकेला फसवून पळून गेले आहेत. हे तुमचे आमचे अन्नदाते असून जर त्यांच्या जीवाशी जर खेळाल तर तुमची गाठ शिवसेनेशी आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

पीक विमा योजनेत जो घोळ झाला आहे त्याचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसलाय त्यांच्या मदतीसाठी शिवसेनेने पीक विमान मदत केंद्रे सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील शेतकऱ्यांना आवाहन केलं की ”लढण्याची तुमच्यात धमक आहे आणि शिवसेना तुमच्यासोबत आहे. ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे त्यांनी या मदत केंद्रांवर यावं.” ‘या शेतकऱ्यांना न्याय कोण देत नाही ते मी पाहतो’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले.

उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील जनतेला ‘तुमचे आमच्यावरील प्रेम कमी झाले आहे का?’ असा प्रश्न विचारला. या गंगापूरमध्ये भगवा मागे कसा काय पडला याचं आश्चर्य वाटत असल्याचं ते म्हणाले. कोणीतरी येऊन आपल्याला उल्लू बनवतो आणि आपण बनतो याचं याचंही आश्चर्य वाटत असल्याचं ते म्हणाले.

धिरज करळे: