शेतकऱ्यांनो बियाणांची खरेदी करताय? मग वाचाच!

बाजारातून बियाणे खरेदी करत असाल तर योग्य ती पारख असायलाच हवी अन्यथा फसगत होऊ शकते. म्हणून आज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

बोगस’चा सुळसुळाट

हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. या कंपन्यांना शासनाची कोणतीही परवानगी नाही. सदर बियाणांमुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे या कंपन्यांनी कोणतेही आश्वासन दिले तरी शेतकऱ्यांनी या आश्वासनांना बळी पडू नये.

बियाणांची खरेदी करताना

सर्वात महत्वाचे म्हणजे अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणांची खरेदी करावी.
बियाणांची खरेदी करताना पक्की पावती घ्यावी.
बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पॉकिटातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.
भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पॉकिट सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी.
पॉकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घ्यावी.

बोगस बियाणांविषयी काही तक्रारी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.

पक्के बिलच मागा

खासगी बियाणे कंपन्या दुकानदाराला मोठ्या प्रमाणात मार्जिंन देत असल्यामुळे बऱ्याचवेळा विक्रेते छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीत बियाणे उपलब्ध करून देतात. मात्र बिल ओरिजनल न देता डुप्लिकेट बिल देतात.

या बिलाच्या माध्यमातून ते शेतकऱ्याकडून अधिक पैसे घेतात व ओरिजनल बिलावर मात्र कमी किंमत लिहितात. यामध्ये शेतकरी व शासनाची लूट होते. त्याचबरोबर बियाणे उगवले नाही. यासारखी समस्या निर्माण झाल्यास पक्के बिलच आवश्यक असल्याने शेतकऱ्यानी दुकानदाराला पक्के बिलच मागावे.

…म्हणून बियाणांची पिशवी सांभाळा!

बियाणे खरेदी केल्यानंतर बियाणांची पिशवी, मूठभर बियाणे आणि पावती सांभाळून ठेवावी. कारण कंपनीने सांगितल्या प्रमाणे जर बियाणे उगवले नाही. तर अशा वेळी पक्के बिल आणि बियाणांची पिशवी आवश्यक ठरते. यामुळे ते कंपनीकडे झालेल्या नुकसानीचा दावा करू शकतात.

बियाणांच्या तक्रारीसाठी काय कराल?

खत आणि बियाणे वाटपात अधिक पारदर्शीपणा आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. कोणतीही तक्रार असल्यास 18002334000 या क्रमांकावर संपर्क साधून शेतकऱ्यांना आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: