माऊलींची पालखी जेजुरीत विसावली, बेल भंडार्‍याची मुक्तपणे उधळण

जेजुरी:औदुंबर भिसे
वारी हो वारी |
देई का गां मल्हारी ॥
त्रिपूरीरी हरी |
तुझ्या वारीचा मी भिकारी ॥

सोपानदेवांच्या सासवड नगरीचा निरोप घेवून जेजूरीकडे मार्गस्थ झालेल्या श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जेजूरी नगरीत आगमन होताच जेजूरीवासियांनी बेल भंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.

पहाटे श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानच्यावतीने माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा करून हा सोहळा सकाळी जेजूरीकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा १० वाजता बोरावके मळा पोहोचला. येथे वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी घेतली. सकाळी १०.३० वाजता सोहळा दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी यमाई शिवरीकडे मार्गस्थ झाला. बोरावके मळा येथे हिरवीगार फळा फुलांच्या मळ्यातून मार्गक्रमण करीत सोहळा दुपारी १२.१५ वाजता यमाई शिवरी येथे पोहोचला. आज पहाटेपासूनच पावसाची संततधारा सुरु होती. अशा वातावरणच वारकरी मार्गक्रमण करीत होते. दुपारी यमाई शिवरी येथे सोहळा पोहोचताच पावसाचा जोर वाढला. या पावसातच वारकऱ्यांनी दुपारचे भोजन घेतले. सुमारे एक तास पावसाने वारकऱ्यांना झोडपले. भोजन व विश्रांतीनंतर हा सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ३.३० वाजता तो साकुर्डे येथे पाहेाचला.

जेजूरीसमीप येताच दिंड्यादिंड्यांमधून मल्हारीचे गुणगान करणारे संतांचे अभंग गायले जात होते. वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. टप्पा लहान असल्याने वारकरी न थकता मार्गक्रमण करीत होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या रेनकोटचा वापर वारकऱ्यांना आजच्या वाटचालीत झाला. दिवसभर पावसाची भुरभुर सुरु होती. 

सासवड नगरीत हरिनामाचा जयघोष

जेजूरीनगरीत माऊलींचे अश्‍व सायंकाळी ५ वाजता तर पालखी सोहळा सायंकाळी ५.३० वाजता जेजूरी हद्दीत पोहोचला. जेजुरी हद्दीत सोहळा येताच जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपाध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, मुख्याधिकारी संजय केदार, मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड.अशोक सपकाळ, विश्वस्त शिवराज झगडे, संदिप जगताप, राजकुमार लोढा, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे यांच्यासह जेजुरी नगरवासियांनी बेलभंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत सोहळ्याचे उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. संपूर्ण सोहळ्यावर भंडारा उधळल्याने सोहळ्याला सोन्याची झळाळी आली होती. येथील स्वागत स्विकारून सायंकाळी साडेसहा वाजता सोहळा पालखीतळावर पोहोचला. समाज समाज आरतीनंतर सोहळा जेजूरी मुक्कामी विसावला आहे. सोमवारी हा सोहळा सकाळी वाल्हे मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: