शरद पवार म्हणाले, सरकारने शेतकऱ्याबाबत तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही…

नाशिक: एकीकडे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखीनच तीव्र होत असताना इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नूतन आमदार रोहित पवार हे मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.

आज शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तांदूळ, द्राक्ष, सोयाबीन, मका सर्वच पिकं बर्बाद झाली आहेत. शेतकऱ्यांनी पिकांवर जो खर्च केला तो वाया गेला आणि त्याच्या हाती उत्पन्नही लागले नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची गोबापूर कळवण तालुका येथे व्यथा जाणून घेतल्या.

इथल्या शेतकऱ्यांना अपेक्षा विचारली तर कर्जमाफी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारने या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत. शेतकऱ्यांवर जे काही कर्ज आहे ते माफ केले पाहिजे तसेच सरकारने शेतकऱ्यांना एकरी नुकसानभरपाई द्यावी. शासनाच्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजले की सरकारने नुकसानभरपाईसाठी कोणता ठोस निर्णय घेतला नाही. नुकसानभरपाईसाठी जे निकष आता लावले जात आहेत ते २-३ वर्षांपूर्वीचे आहेत. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे.

आम्ही इथल्या भागात झालेल्या नुकसानीची सखोल माहिती घेऊ व स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेऊन सरकार दरबारी दाद मागू. सरकार संवेदनशीलपणे आमचे म्हणणे ऐकून मदत करेल अशी आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ अशी भूमिका पवारांनी घेतली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: