‘ मोरूची मावशी ‘ ला बार्शी करांची भरभरून दाद, विनोदी नाटकाने तिसरा दिवस गाजवला

गणेश भोळे/प्रशांत खराडे

बार्शी :बार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून सुरू असलेल्या भगवंत महोत्सवाचा तिसरा दिवस आचार्य प्र के अत्रे लिखित मोरूची मावशी या तुफान विनोदी नाटकाने गाजविला. बार्शीकरांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला.

प्रारंभी शहरातील अभियंते व मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत भगवंत प्रतिमपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, उपमुख्याधिकारी शिवाजी कांबळे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दिगंबर थळपती, अरुण बारबोले, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, प स उपसभापती अविनाश मांजरे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, इंजि. अरुण शहा, कल्याण देशपांडे, भारत बारवकर, सारंग कुलकर्णी, अमित इंगोले, प्रशांत पैकेकर, भीमाशंकर शेटे, गिरीश देशपांडे, नितीन देशमुख यांच्यासह उदय पोतदार, माधव देशमुख, केशव घोगरे, विनायक डोईफोडे, संदेश भोंडे आदी उपस्थित होते.

यावेळी इंजि. कल्याण देशपांडे यांनी नगरपालिकेच्या व भगवंत देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून होत असलेल्या या महोत्सवाचे कौतुक करत शहराच्या विकासासाठी पालिकेला आवश्यक तेथे तांत्रिक मार्गदर्शन करू असे आश्वासन दिले. अमित इंगोले यांनी श्री भगवंत मानाचे देवस्थान आहे. सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहेत. हा महोत्सव असाच वाढत जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.
अत्रे लिखित प्रशांत विचारे दिग्दर्शित व भरत जाधव निर्मित हे नाटक. भैय्या व मोरू एका घरात राहतात. त्यांचा मित्र बंड्या हा नाटकात काम करत असतो. एका संस्थानची राणी असलेली मोरूची मावशी मोरू व भैय्याला भेटायला येणार असते. तिची भेट घालून देण्यासाठी ते दोघे ज्यांच्यावर प्रेम करतात त्या उषा व निशा यांना बोलावतात. कारण स्वतः चे प्रेम त्या दोघींसमोर व्यक्त करू शकतील अशी तीच एक संधी असते. पण घोळ असा होतो की, मोरूची मावशी येतच नाही. हे जेंव्हा भैय्या व मोरूला कळते तेंव्हा ते आपला मित्र बंड्या (भरत जाधव) यास मोरूची मावशी बनवतात आणि जो गोंधळ होतो तो या नाटकातून उलगडतो. नाटकातील टांग..टांग..टिंगा गीताला रसिकांनी दाद दिली. भरत जाधव यांनी साकारलेली मोरूची मावशी रसिकांना भावते. प्रारंभी दिवंगत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहत या नाटकाला सुरुवात झाली. सूत्रसंचालन श्रीधर कांबळे, अजित कुंकुलोळ यांनी केले.

मंगळवारचे कार्यक्रम
भगवंत मंदिरात सायंकाळी सहा वाजता श्रेयस बडवे पुणे यांचे हरिकीर्तन तर भगवंत मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता संगीत रजनी हा ऑर्केस्ट्रा होणार आहे.

admin: