भाजपाला मागील वेळेपेक्षा जास्त जागा मिळणार-राजनाथसिंह

दिल्ली: (पीटीआय )गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपला जास्त जागा मिळतील. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला NDA दोन तृतियांश बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांनी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे आधी जाहीर करावे, अशी मागणीही राजनाथ सिंह यांनी केली.

नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले, २०१४ मध्ये भाजपला लोकसभेत जितक्या जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत मिळतील, या मतापर्यंत मी पोहोचलो आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन तृतियांश बहुमत मिळण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. २०१४ मध्ये लोकांना पंतप्रधानांकडून ज्या अपेक्षा होत्या. त्याचे रुपांतर आता विश्वासात झाले आहे. लोकांचा नरेंद्र मोदींवर विश्वास बसला आहे. गेल्यावेळी नरेंद्र मोदी विरुद्ध मनमोहन सिंग/सोनिया गांधी असा सामना होता. यावेळी नरेंद्र मोदी विरुद्ध कोण हेच अजून स्पष्ट नाही. विरोधकांनी देशातील लोकांना अंधारात ठेवणे योग्य नाही. त्यांनी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली.

नरेंद्र मोदी हे नीच वृत्तीचे असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पूर्वी केले होते. त्यांनी पुन्हा एकदा आपले म्हणणे योग्यच असल्याचे म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी हाच मुद्दा उपस्थित करीत यावर काँग्रेसने आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे, असे म्हटले आहे. 

admin: