मॉन्सून उद्या सकाळपर्यंत अंदमानात ?

पुणे: महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा ५ जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दीर्घकालीन सरासरी वेळेनुसार मॉन्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो. मात्र यंदा मॉन्सूनचे आगमन चार दिवस उशीराने होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

दरम्यान, रविवार (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोणत्याही क्षणी मॉन्सून अंदमानात दाखल होण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. त्याची तीव्रता वाढून या भागात चक्रीवादळ घोंगावणार आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनच्या प्रवाहाला चालना मिळणार असून, रविवारी (ता.१७) सकाळपर्यंतचा ४८ तासांमध्ये केव्हाही मॉन्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरेदाखल होण्यास पोषक स्थिती आहे.

हवामान विभागाने नुकतेच मॉन्सून आगमनाच्या संभाव्य तारखांच्या नवीन वेळापत्रक जाहीर केले. यानुसार मॉन्सून केरळमध्ये १ जून दाखल होण्याचे वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र यंदा चार दिवस उशीराने म्हणजेच ५ जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, वाऱ्यांचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे.

मॉन्सून देवभमी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर देशात दाखल झाल्याचे जाहीर केले जाते. त्यानंतर हवामानात वेगाने बदल होऊन उन्हाळा ऋतूचे पावसाळा ऋतूमध्ये रुपांतर होत. ज्या भागात मॉन्सून दाखल होत जातो तेथे उन्हाच्या झळा कमी होतात. भारतीय हवामान विभागातर्फे २००५ पासून मॉन्सूनच्या केरळातील आगमनाच्या तारखा जाहीर केल्या जातात.

वायव्य भारतातील तापमान, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचे वाढलेले प्रमाण, दक्षिण चीन समुद्रातून परावर्तीत होणारा किरणोत्सर्ग, अग्नेय हिंद महासागरावरील हवेच्या खालच्या स्तरात वाहणारे वारे, विषुववृत्तालगत हवेच्या वरच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातून परावर्तीत होणारा किरणोत्सर्ग या सहा घटकांच्या अभ्यासवरून स्टॅटस्टिकल मॉडेलच्या आधारे मॉन्सून आगमनाची वेळ जाहीर केली जाते. त्यानुसार वाऱ्यांच्या आगमनात चार दिवसांची मागे पुढे तफावत गृहीत धरण्यात येते.

दरम्यान यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १५ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरवातीला एल-निनो स्थिती सर्वसामान्य राहणार असून, शेवटच्या टप्प्यात ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून हंगामाचा सुधारित दिर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनचे आगमन

वर्ष अंदाज प्रत्यक्ष आगमन
२०१५ ३० मे ५ जून
२०१६ ७ जून ८ जून
२०१७ ३० मे ३० मे
२०१८ २९ मे २९ मे
२०१९ ६ जून ८ जून

साभार ऍग्रोवन

ग्लोबल न्युज नेटवर्क: