मॉन्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला;15 ते 20 ऑक्टोबर पर्यत पाऊस पडणार

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ९) पश्‍चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला. उशिरा आगमन झालेल्या मॉन्सूनचा यंदा हा आतापर्यंतचा सर्वांत उशिराने परतीचा प्रवास ठरला आहे. यापूर्वी १९६१ मध्ये १ ऑक्टोबरला मॉन्सूनने पश्‍चिम राजस्थानमधून मुक्काम हलविला होता.

परतीच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारपर्यंत (ता. ११) वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची घोषणा करण्यासाठी सलग पाच दिवस पावसाची उघडीप असणे, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होणे, हवेचा खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होणे आवश्यक असते. ही स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी (ता. ९) पंजाब, हरियाना आणि उत्तर राजस्थानमधून मॉन्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

यापूर्वी १ ऑक्टोबर १९६१ मध्ये सर्वांत उशिराने माघारी फिरला होता. त्यांनतर २००७ मध्ये ३० सप्टेंबरला राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. यंदा या दोन्ही वेळा चुकवून मॉन्सूनने सर्वांत उशिरा ९ ऑक्टोबरला मुक्काम हलविला आहे. 

यंदा मॉन्सून कालावधीत देशात ११० टक्के पाऊस पडला. ११९४ नंतर म्हणजेच २५ वर्षांनंतर देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात उशिराने झालेले आगमन, पावसाचे प्रमाण, परतीची सुरुवात या सर्वच बाबतीतील विक्रम मोडले गेले आहेत.

देवभूमी केरळमध्ये आठ दिवस उशिराने आगमन झाल्यानंतर साधारणत: वेळेच्या पाच दिवस उशिराने (१९ जुलै) मॉन्सूनने देश व्यापला. साधारणत: १ सप्टेंबरला देशातून माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने सव्वा महिना अधिक   मुक्काम केला. 

साधारणत: १ ऑक्टोबरला कोकणाचा बहुतांशी भाग, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागातून मॉन्सून परतत असतो. तर १५ ऑक्टोबरच्या आसपास मॉन्सून देशाचा निरोप घेतो. त्यानंतर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मॉन्सून) साधारणत: १५ डिसेंबरपर्यंत पाऊस पडतो. यंदा मात्र मॉन्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला. महाराष्ट्रातून १५ ते २० ऑक्टोबर या कालवधीत मॉन्सून माघारी फिरण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

साभार ऍग्रोवन

ग्लोबल न्युज नेटवर्क: