मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून कोणी आलेला नाही! फडणवीसांना उद्धव ठाकरे यांचा टोला

विधानसभा निवडणूक निकाल लागून आठवडा उलटला तरी महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा ‘पेच’ कायम आहे. ‘मीच मुख्यमंत्री’ असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘टोला’ हाणला. ‘मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून कोणी आलेले नाही’ असे सांगून पुढची दिशा स्पष्ट केली. शिवसेना भवनात नवनिर्वाचित आमदारांसमोर शिवसेना पक्षप्रमुखांनी आज महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर परखड भाष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी संध्येला ‘वर्षा’ बंगल्यावर पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना सत्तावाटपाचा 50-50 फॉर्म्युला नाकारला होता. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, मात्र त्याबाबत कोणताही शब्द दिलेला नाही किंवा निर्णयही झालेला नाही असे सांगून फडणवीस यांनी मीच मुख्यमंत्री होणार असे म्हटले होते.

शिवसेना भवनात आज शिवसेनेच्या आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या ‘त्या’ विधानाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला नाकारणारे ते वक्तव्य फडणवीस यांनी करायला नको होते. त्यामुळेच सॉफिटेलमधील बैठक रद्द केली असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला जर कुणी खोटे ठरवत असेल तर तुम्हाला चालेल का, असा सवाल त्यांनी आमदारांना केला तेव्हा सर्वांनी एकमुखाने ठामपणे नकार दिला.

कोणताही प्रस्ताव नाही

सत्तेतील जागावाटपाबाबत अनेक अफवा सुरू आहेत. मीडियाच्या माध्यमातूनही काही प्रस्ताव सुरू आहेत, पण त्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे स्पष्टपणे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, आपण मित्रपक्षाला मित्रपक्षच मानतो, शत्रूपक्ष मानत नाही. मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर जे ठरले आहे ते त्यांनी करावे. आम्ही स्थिर सरकार देऊ.

ग्लोबल न्युज नेटवर्क: