मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो, संजय राऊतांचा पुनरुच्चार

मुंबई । विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश मिळाला असला तरी सध्या शिवसेना व भाजप यांच्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा असल्याचा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, सत्तेत समसमान वाटप व्हायला हवं. मुख्यमंत्र्यांची सत्तास्थापनेचं विधान त्याचीच वाट पाहत आहोत. कार्यकर्ते, नेते, व्यापारी राजा नसल्याचं म्हणून राऊतांनी भाजपला टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेने ठरवलं तर बहुमत सिद्ध करू शकते. आम्हाला मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान वाटप हवं आहे. वाटाघाटी व्यापारी करतात आम्ही करत नाहीत. आम्ही हवेत तीर मारत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आजच शपथ घ्यायला काय हरकत आहे? ते यासाठी 8 दिवस का थांबले? भाजपनं चर्चा का सुरू केली नाही. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी खुशाल शपथविधी करावा. परंतु शिवसेना मात्र स्थिर सरकारसाठी बहुमत सिद्ध करेल, असे म्हणून संजय राऊतांनी मोठा इशाराच भाजपला दिला.

आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तथापि, राऊतांनी केलेल्या दाव्याप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा झाल्यास राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा त्यांना मिळवावा लागणार आहे. यासाठीच तुम्ही पवारांची भेट घेतली होती का, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर राऊत म्हणाले की, पवारांच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नव्हते. बळीराजाच्या प्रश्नावर आमच्यात चर्चा झाली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात आहे. राज्यात सध्या सरकार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच आम्ही पवारांशी चर्चा केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: