मान्सून ची प्रगती जवळपास केरळ राज्य व्यापले, गुरुवार पर्यत कोकण सह मध्य महाराष्ट्रात पोहचण्याची शक्यता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता. १३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोचण्याची शक्यता आहे. 

रविवारी (ता. ९) दुपारनंतर राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मृगसरींनी जोरदार सलामी दिल्याने खरिपाच्या पूर्वमशागतीला वेग येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सांयकाळी जोरदार पाऊस पडला, जिल्ह्याच्या धरण परिसरातही चांगल्या सरी कोसळल्या. सातारा जिल्ह्यातही झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले भरून वाहिले, तर ऊस पिकाचे नुकसान झाले. 

सांगली मिरजेसह जिल्ह्यातील पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्यांत पावसासह गारा पडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात चिपळूण तालुक्यासह खेड, दापोली, गुहागर आणि संगमेश्‍वर तालुक्यांत झालेल्या पावसाने धूळपेरण्या केलेल्या बळिराजाला दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांत रविवारी रात्री चांगला पाऊस झाला. अकोले येथे सर्वाधिक ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यासह काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे.

दरम्यान मॉन्सूनचा प्रवास अडखळत सुरू असून, यंदा तब्बल आठवडाभर उशिराने शनिवारी (ता. ८) केरळात आगमन झाले. त्यानंतर सोमवारी (ता. १०) मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्रासह, लक्षद्वीप बेटांचा उर्वरित भाग, केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केली. केरळमधील कन्नूर आणि तामिळनाडूमधील मदुराईपर्यंत मॉन्सून दाखल झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह ईशान्य भारतातील मिझोराम, मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अरबी समुद्रात वादळाचे संकेत

लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्राची तीव्रता वाढली आहे. मंगळवारपर्यंत (ता. ११) अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहेत. उत्तरकडे सरकत जाणारे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र, केरळच्या किनाऱ्यावर समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

admin: