आषाढी नियोजनासाठी मंत्रिमंडळाची बैठक विठुरायाच्या नगरीत घ्या

मुंबई- आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक तसेच राज्यभरातून अनेक पालख्या व दिंड्या येत असतात. त्यांच्या सोयी सुविधा व उपाय योजनांबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक पंढरपूर येथे घ्यावी अशी मागणी वारकरी पाईक संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली.

आषाढी वारीसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून दहा लाखाहून अधिक भाविक येतात. यासाठी पायाभूत सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केला जातात मात्र अलिकडच्या काळामध्ये भाविकांची वाढत आहे. तसेच पायी चालत येणार्‍या मानाच्या सात संतांच्या पालख्या तसेच वेगवेगळ्या भागातून येणार्‍या शेकडो दिंड्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय बराच वेळ तोकडे पडतात किंवा उच्चस्तरीय परवानगी नसल्याने काही निर्णय रखडले जातात. यासाठी मंत्रिमंडळाने काही निर्णय घेणे गरजेचे आहे.

पंढरीची आषाढी यात्रा हे महाराष्ट्राचे वैभव असून उत्तर प्रदेश मधील प्रयागराज कुंभमेळा धर्तीवर या यात्रेचे सुयोग्य नियोजन होणे गरजेचे आहे. याकरिता मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक पंढरपूर येथे घ्यावी अशी मागणी पाईक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत महाराज वासकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने मुंबई येथे करण्यात आली.यावेळी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर, देविदास महाराज ढवळीकर, हरि महाराज लबडे व मंगेश चिवटे उपस्थित होते.

admin: