बार्शी शहर व परिसरात धुवांधार पाऊस, बळीराजा सुखावला

बार्शी : बार्शी शहर परिसरात आज दुपारच्या सुमारास हस्त नक्षत्राचा वीजेच्या कडकडाटासह सुमारे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

यंदाच्या पावसाळ्यात बार्शी शहर व तालुक्यात अगदीच जेमतेम पाऊस झाला आहे. सुरुवातीचे मृग नक्षत्रात शेवटच्या टप्प्यात थोडा पाऊस झाला. अशा अल्प पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकला. त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी वगळता हस्त नक्षत्र पर्यंतची बहुतांशी सर्व नक्षत्रे जवळपास कोरडी गेली.

त्यामुळे खरीपाची पिके पाण्याअभावी खुरटी राहिली. त्यामुळे काही भागात खरिप पिके मोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर खरीप पिके जोपासली आहेत. रब्बी पेरणी साठी तरी पाऊस होणार का अशा विवंचनेत शेतकरी असताना उत्तरा नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस झाला. यामुळे कशाबशा तगलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले.

तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही पावसाची पडती भावना पाहून कांदा लागण करण्याचे धाडस केले. कांदा लागण करण्यासाठीही हा पाऊस लाभदायी ठरला. त्यानंतर हस्त नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस होत आहे. परंतु हा पाऊस तालुक्यात सर्वदूर नाही. ज्या भागात पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. अशा भागातील रब्बी पेरण्या मार्गी लागल्या आहेत.

अजूनही काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच हस्त नक्षत्र संपत आलेले असताना आज दुपारी बार्शी शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने धुवाँधार हजेरी लावली. त्यामुळे सुरू असलेल्या योग्य वाफस्या अभावी रब्बीच्या पेरण्या खोळंबणार आहेत. खरीप पिके तसेच ऊस आदी बागायती पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: